मुंबई : राज्यात कोकणाला महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी राजकीय नेत्यांनी केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील इथे दौरा केला. दरम्यान, दौऱ्याच्या वेळी एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने दिसल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
“दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केली,” असे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.
दरम्यान, “अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” तसेच “वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंचे नाव न घेतला गुरुवारी नाराजी जाहीर केली.