मुंबई – महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आता अयोध्येकडे धाव घेताना दिसत आहेत. मनसे आणि शिवसेनेकडून यापूर्वीच अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला तर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे 10 जूनला राम नगरी अयोध्येत जाणार आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी कोणताही गाजावाजा न करता अयोध्येला जाऊन श्री रामाचे दर्शन घेतले. त्यानंतर, आता काँग्रेस पक्ष देखील अयोध्येला जाण्याच्या शर्यतीत उतरला आहे.
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येतील दशरथ गादीचे महंत ब्रिजमोहन दास यांनी नाना पटोले यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर येथे माझी भेट घेतली. pic.twitter.com/mHHlHH5Imc
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 9, 2022
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करत अयोध्ये भेटीच्या निमंत्रणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,”अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर येथे माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी मला अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मी त्यांचे आभार व्यक्त केले.”
दरम्यान, नाना पटोले यांनी जरी हे निमंत्रण स्वीकारले असले तरी ते अयोध्या दौरा करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.