मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. आझमगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

अखिलेश यादव म्हणाले कि, २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशमध्ये सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय योगी सरकारवर निशाणा साधताना अखिलेश यादव म्हणाले कि, आम्हाला लोकांना एवढेच सांगायचे आहे कि, भाजप हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे. भाजपकडे कोणतेही कामे नसून सपाच्या कामांना पुढे करत आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे लोक त्यांची जातीयवादाच्या नावावर बदनामी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येत एक नवीन राजकीय पर्याय लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकसभा जागांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सपा बसपा आघाडीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. बसपाला 10 तर सपाला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला होता. 62 जागांसह उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.