नवी दिल्ली : देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मास्क आणि सॅनिटाझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील अनेक ठिकाणी सॅनिटायझरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यचेही दिसून येत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी आता भारतातील दिग्गज कंपनी महिंद्रा पुढे सरसावली आहे. व्हेंटिलेटर्सनंतर आता महिंद्रा ही कंपनी सॅनिटायझरच्या उत्पादनात उतरली आहे.
एकीकडे जगभरातील वैज्ञानिक करोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी औषधांचे संशोधन करत आहेत. तर दुसरीकडे याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापरही वाढत आहे. गेल्या महिन्यात महिंद्रा यांनी कमी किंमतीत व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणार असल्याचे म्हटले होते. त्याची सरासरी किंमत ७ हजार ५०० रूपये असल्याचंही सांगण्यात आले होते.
महिंद्रा कंपनीच्या एका टीमने सॅनिटायझरच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर यासंबंधी उत्पादनाचा एक परवाना मिळवला आहे. यानंतर कंपनीच्या ब्रँडेड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कंपनी फेस शिल्डचेही उत्पादन करत आहे. याचा वापर वैद्यकीय कर्मचारी आणि करोनाचं संक्रमण झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.
कंपनीने शिल्डचे असेंबलिंग मुंबईतील कांदिवली येथील प्लांटमध्ये सुरू केले आहे. सुरूवातीला कंपनी ५०० फेस शिल्डचे उत्पादन करणार आहे. त्यानंतर गरजेनुसार याचे उत्पादन वाढवण्यात येईल. महिंद्रा यांच्याव्यतिरिक्त टाटा मोटर्स, मारूती सुझुकी आणि ह्युंदाईसारख्या कंपन्याही करोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी झाल्या आहेत.