महाराष्ट्रनंतर आता झारखंडमध्येही भापजची कोंडी

लोक जनशक्‍ती पक्षाची स्वतंत्र विधानसभा लढवण्याची घोषणा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बहूमत मिळूनदेखील पक्षाला सत्ता स्थापन करता येत नाही. हा पेच मागच्या 17 दिवसांपासून राज्यात सुरू आहे. महाराष्ट्रात हे सुरू असताना दुसरीकडे झारखंडमध्येदेखील भाजपची कोंडी झाली आहे. कारण भाजपचा मित्रपक्ष असणारा लोक जनशक्‍ती पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली आहे.


लोक जनशक्ती पक्षाने राज्यात स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजपसाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. या निर्णयाची घोषणा करताना चिराग पासवान यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या जागा वाटपावर नाराजी व्यक्‍त केली आहे. यावेळी पासवान यांनी, पक्षाने ज्या ठिकाणांवर उमेदवारी मागितली होती त्या ठिकाणांवर भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता आम्ही या निवडणूका स्वतंत्रपणे लढण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे म्हटले. तसेच राज्यातील 50 जागांवर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

पासवान यांनी यावेळी स्पष्ट केले की एलजेपी ‘टोकन जागा’ स्वीकारणार नाही. ते म्हणाले की आम्ही आघाडीअंतर्गत सहा जागांची मागणी केली होती, परंतु या सर्व जागांसाठी उमेदवार रविवारी भाजपने जाहीर केले आहेत. एलजेपी भाजपशी युती करण्यास उत्सुक होते, परंतु भाजपाने त्यात रस दाखविला नाही. प्रादेशिक पक्षाकडे राज्यातील मतदारांना काहीच कमी ऑफर नाही असे भाजप नेत्यांचे मत आहे. बिहारमध्ये भाजप आणि एलजेपी हे युतीचे भागीदार आहेत. बिहारमधील भाजपाचे आणखी एक मित्रपक्ष असलेल्या जदयूनेही झारखंड निवडणुकीत एकट्याने जाण्याची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.