मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातमध्येही काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण?

मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातेत देखील काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. देशभरातील अन्य १६ राज्यांप्रमाणे गुजरातमध्ये देखील राज्यसभेची निवडणूक पार पडणार असून २६ मार्चरोजी चार जागांसाठी गुजरात विधानसभेमध्ये मतदान होईल.

दरम्यान, राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून घोडेबाजार होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गुजरातेतील विजय रुपाणी सरकारमधील मंत्री कुंवरजी बावलिया यांच्या दाव्यानुसार, काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला असून इतर तिघांचे मोबाईल बंद आहेत. हे पाचही आमदार भाजपला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे.

याच पार्श्ववभूमीवर आता काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून १४ आमदारांना अगोदरच जयपूरला हलवलं आहे. तर, आणखी ३६ आमदारांना देखील राजस्थानला पाठवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. याव्यतिरिक्त अन्य पाच आमदारांना गुजरातमधील एका रिसॉर्टमध्ये थांबवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास १५ ते १८ विश्वासू आमदार गुजरातमध्येच थांबून विधानसभेच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग नोंदवणार आहेत.

सर्व आमदारांना मोबाईल बंद ठेवण्याचे तसेच कुटुंबातील सदस्यांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना भेटू नये असे आदेश देण्यात आलेत. सद्य परिस्थितीत काँग्रेस हायकमांडच्यादृष्टीने राजस्थानमधील अशोक गहलोत यांचे सरकार सर्वात सुरक्षित सरकार असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.