मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना या निकालाचा मोठा धक्का बसल्याच दिसून आलं आहे.
दरम्यान, आता शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा होणार आहे. ‘सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे’ असं देखील उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
उद्धव ठाकरेंची कोकणातील सभा झाल्यानंतर त्यांची दुसरी सभा कुठे होणार? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच खासदार संजय राऊत यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून, माध्यमांशी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांची 26 मार्च ला मालेगाव येथे जाहीर सभा होणार असल्याचं सांगितलं आहे.
तसेच, यावेळी संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर देखील निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं. राऊत म्हणाले, “मालेगाव येथे उत्तर महाराष्ट्राची जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांची दादा भुसे यांच्या मतदार संघात ही जाहीर सभा होणार असून, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सभेच्या तयारीला लागले आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.