कोल्हापूरनंतर सोलापुरात निघणार क्रांती मोर्चा; आरक्षणप्रश्नी मराठा समाजाने आवळली पुन्हा वज्रमूठ

कोल्हापूरनंतर सोलापुरात निघणार क्रांती मोर्चा
आरक्षणप्रश्नी मराठा समाजाने आवळली पुन्हा वज्रमूठ

सोलापूर – मराठा आरक्षणप्रश्‍नी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाल्यानंतर त्याच धर्तीवर सोलापुरात देखील दुसरा क्रांती मोर्चा काढण्याचे निश्‍चित झाले आहे.

सोमवारी, जुनी पोलीस लाइन येथील अण्णासाहेब पाटील मंगल कार्यालयात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब झाले. मराठा आरक्षण आणि मराठ्यांच्या विविध मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 16 जून रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मोर्चा निघणार आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरातदेखील त्याच धर्तीवर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या मोर्चासाठी सर्व शहर व जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेऊन ठोस नियोजन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. मोर्चा कधी, केव्हा काढायचा यासंदर्भात लवकरच जाहीर केले जाणार आहे.

आता आरक्षण ओबीसीमधूनच हवे –
आता मराठा समाजाला एसईबीसीमधून नको तर ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 1 हजार कोटींचा निधी द्यावा, सारथी संस्थेला 1 हजार कोटी देऊन त्याचे उपकेंद्र सोलापुरात चालू करावे. श्रीमंत शहाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाने वसतिगृह चालू करावे आणि ते शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.