कोहलीनंतर लोकेश राहुलकडे नेतृत्वगुण – चोप्रा

नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीचा कर्णधारपदाचा वारसदार म्हणून विराट कोहलीने स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र, कोहलीनंतर लोकेश राहुल भारतीय संघाचे नेतृत्व तितक्‍याच सक्षमपणे करू शकतो, असा विश्‍वास माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्‍त केला आहे. 

कोहलीने कर्णधारपद सोडले किंवा त्याच्या निवृत्तीनंतर राहुल हाच भारतीय संघाचा कर्णधार होण्यास जास्त पात्र आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना यश मिळवले असले तरीही मला रोहितपेक्षा राहुल जास्त सक्षम वाटतो, असेही चोप्रा यांनी सांगितले.

खरे बोलायचे तर रोहित व कोहली समकालीन असल्याने कोहलीनंतर रोहित कर्णधार होईल असे मानणे चूक ठरेल. पण त्यानंतरच्या काळातील खेळाडूंबाबत विचार केला तर राहुलकडे नेतृत्वगुण असल्याचे स्पष्ट दिसून येते. कदाचित पुढील काळात भारतीय संघाला धोनीचा खरा वारसदार मिळेलही पण तोपर्यंत राहुलला पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

धोनी काय किंवा कोहली काय, कर्णधार कितीही यशस्वी ठरला, तरी प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा क्षण येतोच जेव्हा त्याला आपल्या वारसदाराची निवड करावी लागते. महेंद्रसिंग धोनीने आपला उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर सोपवली. त्यामुळे ही वेळ कोहलीवरही येणारच आहे. त्यावेळी राहुलच या पदासाठी योग्य ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.