मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत आपल्या नव्या राजकीय इनींगला सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मात्रोश्री या निवासस्थानी मातोंडकर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधलं.
दरम्यान, मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक व्हिडीओ पोस्ट करत जनतेचे आशीर्वाद यापुढेही सदैव आपल्या पाठीशी राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मातोंडकर यांनी आज तोंडावर भगवा मास्क लावल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. पक्षप्रवेशानंतर मातोंडकर यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या मराठीमध्ये बोलताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये त्या, आपल्या एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगी ते हिंदी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री या वाटचालीबाबत सांगतात. तसेच जनतेने आपल्याला ज्या प्रमाणे अभिनय क्षेत्रातील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे राजकीय प्रवासातही पाठीशी राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हिडिओची सुरुवात व शेवट करताना त्यांनी जय महाराष्ट्र म्हणत आपण आता शिवसेनेत असल्याचंही दर्शवलं.
आपले आशिर्वाद आपला विश्वास सदैव सोबत रहावा 🙏🏼#जयमहाराष्ट्र 🙏🏼 pic.twitter.com/yhejxjb1QE
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 1, 2020