मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नेत्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून वारंवारपणे करण्यात येत आहे. त्यातच आणखी एका शिवसेना नेत्याच्या मागे चॊकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे. प्राप्तिकर विभागाचे पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी पोहोचले आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.
यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या महिन्या भरात मुंबई महापालिका निवडणुका आहेत, त्यामुळे महापालिकेच्या वॉच मॅनवरही धाड टाकतील, त्याच कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत त्यामुळे ते लावत असतात. त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते.
याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटलं जाण्याची शक्यता आहे.
Big Breaking! शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पहाटेच इन्कम टॅक्सची धाड; चौकशी सुरु