न्यूयॉर्क, दि. 29- इस्रायलनंतर आता अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात करोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे.
विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.
ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणे वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी करोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्कशिवाय बाहेर जाऊ शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आज हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे.
मागील वर्षभर करोना संसर्गामुळे नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. आता लसीकरणामुळे करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यात मास्कशिवाय फिरण्यास मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या नागरिकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
करोना महामारीमुळे विस्कळीत झालेली जनजीवनाची घडी हळूहळू पूर्वपदावर येण्याची आशा पल्लवित झाली आहे. बर्मिंगमच्या अलबामा विद्यापीठातील संसर्गरोग विशेषज्ञ डॉ. माइक साग यांनी रोग नियंत्रण केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्याची वापसी आहे. हे सामान्य जनजीवनाकडे टाकलेले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. साग यांनी दिली आहे.