पुणे – अमिताभ बच्चन यांच्या “गुलाबो सिताबो’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. “गुलाबो सिताबो’ चे डायरेक्शन सुजीत सरकार यांनी केले होते. सुजित सरकारच्या डायरेक्शन खाली अमिताभ बच्चन यांचा आणखी एका सिनेमा लवकरच येतो आहे. “शूबाईट’ असे या सिनेमाचे नाव आहे. काही कारणामुळे हा प्रोजेक्ट बंद करावा लागला होता.
मात्र आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे, असे समजते आहे. “शूबाईट’ ही एका साठ वर्षे वयाच्या व्यक्तीची कथा आहे. उतारवयामध्ये स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न हा नायक करताना या सिनेमात बघायला मिळणार आहे. अर्थात ही भूमिका अमिताभ बच्चन स्वतः साकारत आहेत. या सिनेमाच्या निर्मात्यांनी ऍमेझॉनशी चर्चा केली आहे आणि अमेझॉनवर हा सिनेमा रिलीज होणार आहे असे समजते आहे.
हा सिनेमा रखडण्याचे कारण निर्मात्यांमध्ये झालेले मतभेद हे होते. मात्र आता हे वाद सामोपचाराने सोडवण्यात आले आहेत. विशेषतः “गुलाबो सिताबो’ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगला धंदा करता आल्याने “शूबाईट’च्या निर्मात्यांनीही ओटीटी प्लेटफार्मसाठी आपले मतभेद बाजूला ठेवले आहेत.