नवी दिल्ली : देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे त्याच्यात घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आला आहे. पण या करोनाच्या संकट काळातही काही लोकांना प्रसिद्धीचा सोस असल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वी चांदीचा करोना मास्क तयार केलेल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. त्यांनी चक्क ६० ग्रॅम चांदीचा एक मास्क तयार करून घेतला होता. त्याची किंमत ३ हजार ९०० रूपये इतकी होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील एका व्यक्तीनं साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क बनवल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता सूरतमधून अशीच एक माहिती समोर आली आहे. सूरतमध्ये सध्या हिऱ्याच्या करोना मास्कची सर्वांमध्ये क्रेझ असल्याचे समोर आले आहे.
Gujarat: A jewellery shop in Surat is selling diamond-studded masks ranging between 1.5 lakhs to 4 lakhs. Owner of the shop says, "As lockdown was lifted, a customer who had a wedding at his home came to our shop & demanded unique masks for bride & groom." #COVID19 pic.twitter.com/Oz5ShitRKj
— ANI (@ANI) July 10, 2020
सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं हिरेजडित मास्क तयार केले आहेत. सूरत हे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, सूरतमध्ये एन ९५ सर्टिफिकेशन आणि ३ प्लाय प्रोटेक्शन मास्कची क्रेझ वाढत आहे. तसंच यामध्ये हिरेही लावण्यात आले आहे. यामध्ये खरे आणि सिंथेटिक अशा दोन्ही प्रकारचे हिरे लावण्यात आले आहेत. तसंच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे मास्क तयार करण्यात आले असून ते अनेकांच्या पसंतीसही उतरत आहेत.
जेव्हा ग्राहकांनी लग्न समारंभांसाठी काही वेगळे करण्याची विनंती केली त्यावेळी डोक्यात ही कल्पना आल्याची माहिती हिरे आणि सोन्याचे व्यापारी दिपक चोक्सी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आम्ही वधू वरासाठी अशा हिऱ्यांचे मास्क तयार केले असल्याचेही ते म्हणाले. “मास्कवर सर्वप्रथम गोल्ड कास्केट लावले जाते. त्यानंतर त्यावर हिरे लावले जातात. सिंथेटिक हिऱ्यांच्या मास्कची रेंज दीड लाखांपर्यंत तर खऱ्या हिऱ्यांची रेंज जवळपास चार लाखांपर्यंत आहे, असेही चोक्सी म्हणाले. ग्राहकांच्या बजेटप्रमाणे मास्कवर १५० ते ४०० हिरे लावण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.