फलटण : पाच दिवसानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सुरु असलेली आयकर विभागाची कारवाई संपली आहे. आयकर विभागाच्या चौकशीमध्ये काय समोर आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमधील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता.
आजचा कारवाईचा पाचवा दिवस होता. पाच दिवसानंतर ही कारवाई संपली आहे. आयकर विभागाकडून बुधवारी ही कारवाई सुरु करण्यात आली होती. आयकर विभागाचे अधिकारी निघून जाताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. तसेच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.
कारवाईनंतर संजीवराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी पहिल्या दोन दिवसात पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांचे जे पेपरवर्क होते, त्याला जास्त वेळ लागल्याचे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. आयकर विभागाला या चौकशीतून काहीही सापडलं नाही. त्यांनी माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती, गोविंद मिल्क संदर्भात होती, असे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. राजकीय हेतूनं ही कारवाई झाली आहे का? याबाबत बोलताना संजीवराजे म्हणाले की, याबाबत सांगणे कठीण आहे. सध्या काहीही घडू शकते. पक्ष बदलाबाबत फक्त चर्चा सुरु असल्याचे संजीवराजे म्हणाले.
फलटण येथील संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती बुधवारी आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हापासून सुरू झालेली चौकशी आज पाचव्या दिवशी देखील सुरूच होती. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती, मात्र, या दरम्यानच्या काळातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. आयकर विभागाच्या चौकशीमध्ये काय समोर आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर वारंवार सांगताना दिसत आहेत, या चौकशीतून काहीही समोर येणार नाही.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानासह पुण्यातील घरावर आयकर विभागाने चौकशी केली. पुण्यातील लक्ष्मी या निवासस्थानी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल 50 तासांनंतर संपली आहे. या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पूर्णपणे सहकार्य केले.