मालदीव : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सध्या भारतात आहेत. भारतभेटीत त्यांचा दृष्टिकोन बदलला असून आता ते भारताविरोधात नाही तर चीनच्या विरोधात पावले उचलत आहेत. त्यानुसार त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुइझ्झू यांनी मालदीवमधील लामू गाडू ट्रान्सशिपमेंट पोर्ट प्रकल्पाबाबत चिनी कंपनीसोबत केलेला करार संपवून तो भारताकडे सुपूर्द केला आहे.
लामू गडू ट्रान्सशिपमेंट पोर्ट प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे पहिले कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आले होते. मालदीव सरकारने चीनच्या सीएएमसीई कंपनी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला होता. चिनी कंपनीने या प्रकल्पाबाबत अतिशय हलगर्जीपणा दाखविल्याने हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संतापलेल्या मुइज्जू यांनी भारतासोबत या प्रकल्पावर काम करण्याची योजना आखली.
मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या पत्नी साजिदा मोहम्मद यांनी मंगळवारी ऐतिहासिक ताजमहालला भेट दिली आणि 17 व्या शतकातील या आश्चर्यकारक वास्तुकलेचा नमूना पाहुन ते अगदी भारावून गेले. याच्या सौंदर्याचे वर्णन करणे कठीण आहे. हा मंत्रमुग्ध करणारा वारसा नितांत प्रेम आणि स्थापत्यकलेचा पुरावा आहे असे त्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिले आहे.
मुइज्जू यांना चीन समर्थक मानले जाते. त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भारतविरोधी अजेंड्याचा प्रचारही केला होता. त्यांनी इंडिया आऊट मोहीम सुरू केली होती, पण आता त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. पर्यटन उद्योगातील सततच्या तोट्यामुळे भारताशी संबंध बिघडवून आपले आणि देशाचे नुकसान होत असल्याचे त्यांना समजले आहे. अशा परिस्थितीत लामू गडू ट्रान्सशिपमेंट पोर्ट प्रकल्पावरील करार हे भारतासाठी मोठे राजनैतिक यश आहे.