मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार यांना आज सकाळी साडे दहा वाजता डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर लगेच शरद पवार हे त्यांच्या मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.
प्रकृती अस्व्यास्थ्याच्या कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
दरम्यान, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली होती. शरद पवार शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी इथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले.
शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात पवार यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आलं होतं. तर चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. एकनाथ शिंदे ४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात पोहोचले आणि त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, “शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. शिर्डीतील शिबिराहून परतल्यानंतर चाचण्या, तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.”