fbpx

दसरा-दिवाळीनंतर व्यापाऱ्यांना आता लग्नसराईकडून मोठी आशा

पिंपरी – करोनामुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या व्यापाऱ्यांना दसरा-दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे चांगला दिलासा मिळाला आहे. या दोन्ही सणांच्या काळात विक्री वाढल्याने व्यवसायातील आर्थिक उलाढाल सुरु झाली आहे. सहा महिने दुकाने बंद असल्याने दसरा दिवाळीनंतर आता लग्नसराईचादेखील हात मिळाल्यास आर्थिक तुट भरुन निघण्यास हातभार लागणार आहे. यानिमित्ताने बाजार पुन्हा बहरेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. करोनामुळे मार्च महिन्यापासून लागु केलेल्या टाळेबंदीने दुकानदारांचा व्यवसाय बुडाला. ऑगस्टमध्ये दुकाने सुरू करूनही वाहतुकीवर बंधने असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली होती. परिणामी दुकानातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली. मात्र दसरा- दिवाळीनिमित्त ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दिवाळीत ग्राहकांचा प्रतिसाद वाढला, तरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची आर्थिक उलाढाल कमीच असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. लोकल रेल्वे सेवा सर्वासाठी खुली नसल्याने आणि ग्राहकांची क्रयशक्ती घटल्यानेही विक्रीला फटका बसला आहे. दरवर्षी दिवाळीची खरेदी पंधरा दिवस सुरु असायची. यंदा फक्‍त आठवडाभर ग्राहकांनी खरेदी केली. त्यातून मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के व्यवसाय झाला.

तुलसीविवाहानंतर आता लग्नाचे मुहूर्त असल्याने काहींनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र बहुतांश जणांचे बजेट कोलमडले असून, विवाह सोहळ्यात लोकांच्या सहभागावरील मर्यादांमुळे खरेदीचा खर्चही कमी झाला आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत विक्री चांगली होत असल्याने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भविष्यात व्यवसाय पूर्ववत होईल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.

व्यापाऱ्यांना करोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती
करोनाची दुसरी लाट डिसेंबर महिन्यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तर शहरातील करोनाबाधितांचा कमी झालेला आकडादेखील आता हळुहळू वाढू लागला आहे. करोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा दुसऱ्यांदा बसणारा आर्थिक फटका पचविण्याची अनेक व्यापाऱ्यांमध्ये ताकद नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेची व्यापाऱ्यांना चांगलीच धास्ती बसली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.