वॉशिंग्टन – अमेरिकेचे करोनाग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रिड इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळण्याच्या अगोदर ट्रम्प यांनी इस्पितळातूनच ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसेच वक्तव्य केले आहे.
ट्रम्प यांच्या या ट्वीटची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते लवकरच प्रचाराला सुरूवात करणार आहेत. आता मला बरे वाटते आहे. कोविडला अजिबात घाबरू नका. त्याला तुमच्यावर स्वार होउ देउ नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बिडेन यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. तसे निष्कर्षही मांडले जात आहेत. त्यालाही ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांच्या एका समूहाला ट्रम्प यांनी सातत्याने लक्ष्य केले आहे. आताही ज्या माध्यमांनी बिडेन यांचे पारडे जड असल्याचा दावा केला आहे. त्या माध्यमांवर ट्वीटद्वारे त्यांनी अस्त्र सोडले आहे. फेक न्यूज ओन्ली शोज फेक पोल अशी ट्वीप्पणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ट्रम्प अद्याप पूर्ण बरे झालेले नाहीत. मात्र घरी जाण्याइतपत ते सुरक्षित असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे.