मुंबई – शारदीय नवरात्री देशभर साजरी केली जाते. ठिकठिकाणी माँ दुर्गेची मूर्ती सजवण्यात आली आहे. त्याचबरोबर जागोजागी गरबा , दांडियाचे आयोजन केले आहे. दरवर्षी लोक गरब्याची आतुरतेने वाट पाहत असतात, मात्र यावेळी भाजपशासित राज्य सरकारने गरबा मंडपाबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत.
गरबा मंडपामध्ये प्रवेशापासून सुरक्षेपर्यंत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच राज्यातील भाजप नेतेही मंडप प्रवेशाबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. अशातच मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी भाजपा विविध कार्यक्रम हाती घेत आहे. त्यात मराठी कट्टानंतर आता नवरात्रीत मराठी दांडिया महोत्सवाचं मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव आदिशक्तीचा… जागर मराठी मनाचा…
भाजपा मुंबई आयोजित मराठी दांडिया महोत्सवात सहभागी होऊन
मराठमोळी वेशभूषा करा आणि दररोज जिंका दोन I Phone
सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी एक विजेता आणि एक विजेती जिंकणार आयफोन 11 #navratri2022 pic.twitter.com/IoB2LufMUn
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) September 29, 2022
मुंबई भाजपानं शहरात जवळपास ३०० ठिकाणी गरब्याचं आयोजन केले आहे. त्यासाठी विशेष पासची व्यवस्था असून भाजपाच्या कार्यालयात हे पास उपलब्ध करून देण्यात आले असून ते निशुल्क आहेत. याच दांडियामध्ये भाजपानं भन्नाट ऑफर ठेवली आहे. मराठमोळी वेशभूषा करा आणि दररोज जिंका २ आयफोन, याठिकाणी सर्वोकृष्ट वेशभूषेसाठी एक विजेता आणि एक विजेती यांना बक्षिस म्हणून iphone 11 देण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून ४ ऑक्टोबरपर्यंत याठिकाणी मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे.