पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांचा करोना चाचणीचा अहवालही प्राप्त न झाल्याने अनेक शाळा बंद राहणार आहेत. मात्र, पहिल्या दिवशी म्हणजेच आजपासून महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण पुण्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासनाने 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.
शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र, शाळांनी केलेल्या उपाययोजना हा महत्वाचा भाग होता. महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमधून पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्सिमिटर, वर्गामधील बसण्याची व्यवस्था याचे नियोजन झाले आहे. पण शिक्षकांच्या करोनाच तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत शाळांची तपासणी सुरू आहे. रविवारी (दि. 3) दुपारपर्यंत शहरातील 529 पैकी 232 शाळांची तपासणी पूर्ण झाली आहे.
यामध्ये महापालिकेच्या 44 आणि खासगी 188 शाळा आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 100 टक्के आणि 22 खासगी शाळांना सोमवारपासून वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.
आठवडाभरात उर्वरित शाळांना परवानगी
शहरात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्यांना गेल्या आठवड्यात नाताळाची सुट्टी असल्याने शाळा बंद होत्या. त्यामुळे मनपाच्या पथकास तेथे जाऊन तपासणी करता आलेली नाही.
आता शाळा उघडल्याने त्यांची तपासणी होईल. तसेच शिक्षकांचे करोना तपासणीचे अहवाल सादर होतील. त्यामुळे येत्या आठवड्याभरात शहरातील अनेक शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
23,220 पालकांनी संमतीपत्र
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांना संमतीपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आत्तापर्यंत 23 हजार 220 पालकांनी संमतीपत्र दिले आहे. तर 2 हजार 213 शिक्षकांनी व 842 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी करोना चाचणीचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 13 शिक्षक आणि 7 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, असे निदर्शनास आले आहे.