नवी दिल्ली : निवडणूक आयोग आणि तपास यंत्रणांसह संस्था कठीण परिस्थितीत त्यांचे कर्तव्य बजावत असतात असे नमूद करून एक निरीक्षण त्यांना हताश करू शकते, असा सावधगिरीचा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी दिला आहे. त्यामुळे अत्यंत सक्षम असलेल्या आणि कायद्याच्या नियमांनुसार योग्य नियंत्रण आणि संतुलनासह स्वतंत्रपणे काम करत असलेल्या संस्थांबाबत अत्यंत सावध असणे आवश्यक आहे, असेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
कारण त्यातून राजकीय वादविवाद सुरू होऊ शकतात आणि एका नॅरेटीव्हला चालना दिली जाउ शकते.आम्हाला आमच्या संस्थांबद्दल अत्यंत जागरूक असले पाहिजे असे ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने ती एक पिंजऱ्यात बंद केलेला पोपट असल्याचा समज दूर केला पाहिजे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अलिकडेच नोंदवले होते. त्या पाश्र्वभूमीवर धनखर यांनी हा सल्ला दिला आहे.
कायद्यानुसार चालणाऱ्या लोकशाहीमध्ये धारणा महत्त्वाची असते. सीझरच्या पत्नीप्रमाणेच तपास यंत्रणाही सगळ्यांच्या वर असणे आवश्यक आहे. काही काळापूर्वीच या न्यायालयाने सीबीआयची तुलना पिंजऱ्यात बंदिस्त पोपटाशी करत सीबीआयला फटकारले आहे. पिंजऱ्यात बंदिस्त पोपट असल्याचा समज सीबीआयने खोडून काढणे अत्यावश्यक आहे.
त्याऐवजी, ही धारणा पिंजऱ्यात नसलेल्या पोपटाची असावी, असे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी म्हटले होते. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना त्यांनी ही टिप्पणी करत सीबीआयला समज दिली होती. त्याला उपराष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे उत्तर देत तपास संस्थांबाबत निरिक्षण नोंदवताना अधिक जागरूक असण्याची गरज असल्याचे नमूद केले.