टोरांटो – चीनमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता कॅनडानेही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या मुद्द्यावरून हा बहिष्कार घालण्यात येणार आहे, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हटले आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच चीनमधील हिवाळी ऑलिम्पिकवर अधिकारी पातळीवरील बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. इतर आणखीन काही देशांकडून असाच बहिष्कार घातला जाईल, अशी शक्यता कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मियानी जोली यांनी म्हटले आहे. या देशांच्या या बहिष्काराच्या निर्णयाविरोधात विरोधी उपाय योजना केल्या जातील, असे चीनने म्हटले आहे.
चीनमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत कॅनडाला चिंता वाटते आहे. मित्र देशांबरोबर आगामी काही दिवसात सविस्तर चर्चा केली जाईल, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. हिवाळी ऑलिम्पिकसाठी कॅनडामधून कोणीही अधिकारी प्रतिनिधी गेला नाही, तर चीनला आश्चर्य वाटायला नको, असे ट्रुडो म्हणाले.
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने चीनमधील हिवाळी ऑलिम्पिकसाठी अधिकारी प्रतिनिधी पाठवले नाहीत, तरी या देशांच्या खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही. या देशांचे खेळाडू या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.
चीनच्या वायव्येकडील शिजियांग प्रांतात उघ्युर मुस्लिमांवर केल्या जात असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकवर पूर्ण बहिष्कार घालावा, अशी मागणी हक्क विषयक कार्यकर्त्यांनी केली आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाला चिरडण्यासाठी केल्या जात असलेल्या बळाच्या वापरावरही अनेक संघटनांकडून आक्षेप घेतला जातो आहे.