भाजपाच्या धोबीपछाडनंतर आता “प्रतिडावा’कडे लक्ष

पिंपरी – लाचखोरी प्रकरणामध्ये थेट महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा स्थायी समिती अध्यक्षच अडकल्यामुळे या पक्षाची धोबीपछाड झाली आहे. प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठविल्यामुळे पक्षाची प्रतीमा पूर्णत: मलिन झाली आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपाकडून कोणता प्रतिडाव खेळला जातो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयावर धाड टाकत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांनाच अटक करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपाची मोठी गोची झाली आहे. यातून वेळ मारून नेण्यासाठी “राजकीय कुंभाड’ म्हणून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न यशस्वी न ठरल्यामुळे आता या नेत्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे.
स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचे अभिवचन देत सत्ताधीश झालेल्या भाजपाने गेल्या साडेचार वर्षांत भ्रष्ट कारभारच केल्याचे “एसीबी’च्या कारवाईने शिक्कामोर्तब झाले आहे. तर कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये या पक्षाची पुरती बदनामी झाली आहे. ही बदनामी सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीत अडचणी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे दोन आमदार कोणती भूमिका घेणार आणि डागाळलेल्या प्रतिमा सुधाण्यासाठी कोणता “डाव’ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भागीदारी अन् ठेकेदारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी एकमेकांना सांभाळून घेत पालिकेची तिजोरी लुटण्याचे पाप आतापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी केले आहे. गेल्या चार वर्षांत सत्ता बदलली तरी कारभाराची पद्धत तीच राहिली. पूर्वी राष्ट्रवादी सत्तेत असताना विरोधकांना महापालिकेच्या कामांत अलिखित भागीदारी अन् निविदा प्रक्रियेत ठेकेदारी दिली जात होती. तर या साडेचार वर्षांत राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांची ठेकेदारी सत्ताधारी भाजपाने पोसली. त्यामुळे “तेरी भी चूप, मेरी भी चूप’ म्हणत चाललेल्या कारभाराचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पितळ उघडे पाडले. यातून आता भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दरी निर्माण झाल्याने कोण कोणाचे कोणते उद्योग उघडे करणार ते पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीतील नेत्यांच्या
भागीदारीवर पडणार घाव
कोविडकाळात तसेच त्यापूर्वीही राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी व नेतेमंडळींनी ठेकेदारांना हाताशी धरून निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. त्यातील अनेक निविदांबाबत संशय व्यक्त होत आहेत. तर उघड आरोपही झाले आहेत. यातील काही प्रकरणे समोर आणून राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची तयारी भाजपाकडून केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भागीदारी असणाऱ्या ठेकेदारीचे पितळ उघडे पडल्यास भाजपाला पुन्हा आक्रमक होण्याची संधी मिळणार असून, त्याद्वारे राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची खेळी खेळली जाऊ शकते.





