Jharkhand News| मागील काही दिवसांपासून नव्याने बांधण्यात आलेले पूल कोसळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. मुख्यत: बिहारमध्ये 9 दिवसात पाच पूल कोसळले. यानंतर आता झारखंडमध्येही पूल कोसळल्याची घटना घडली आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता.
झारखंडमधील गिरिडीहमध्ये अर्गा नदीवर पूल बांधला जात होता. हा पूल फतेहपूर आणि भेलवाघाटी दरम्यान बांधला जात होता, जो गिरिडीह आणि जमुईला जोडला जाणार होता. मात्र बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच पुलाचा काही भाग कोसळला. शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे नदीच्या जोरदार प्रवाहामुळे निर्माणाधीन पुलाचा गर्डर तुटून पडल्याचे सांगण्यात येत आहे.
सुमारे ५ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते, मात्र अद्याप याचे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात पुलाचा एक खांब वाकडा झाला, ज्यानंतर बांधकामाधीन पुलाचा गर्डर तुटून नदीत पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या आवाजामुळे नागरिकही घाबरले होते. दरम्यान, या पुलाच्या कामाची जबाबदारी ओम नमः शिवाय कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.