इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक ए इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाचे अध्यक्ष परवेज इलाही यांनी पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांना पुन्हा एकदा आपले समर्थन जाहीर केले आहे. पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले इलाही म्हणाले की ते इम्रान खान यांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे आहेत. अधिकाऱ्यांसोबत आपली कोणती चर्चा झाली असल्याच्या दाव्याचाही त्यांनी इन्कार केला.
पीटीआय पक्षाबद्दल आपली कटिबध्दता व्यक्त करताना इलाही यांनी पक्षाच्या प्रती असलेल्या आपल्या जबाबदारीवरही प्रकाश टाकला. तसेच पक्षात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना त्यांनी इशारा दिला. कलह निर्माण करू पाहणाऱ्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील आणि पुन्हा एकदा देशात पीटीआयचे सरकार येईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली.
निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्यांना उत्तरदायी ठरवले जावे अशी मागणी करतानाच लोकशाही प्रक्रिया दुबळी केल्याबद्दल या लोकांनी पाकिस्तानची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. इलाही यांना कोट लखपत तुरूंगात ठेवण्यात आले होते व बऱ्याच काळानंतर त्यांची सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांनी मुलाखतीत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पंजाब विधानसभेत अवैधपणे नियुक्त्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गेल्या वर्षी ३ जून रोजी त्यांना अटक करण्यात आले होते व भ्रष्टाचाराचे अन्य आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.