पाटण : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. आता लवकरच जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे पाटण तालुक्यातील देसाई व पाटणकर या दोन्ही गटांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आभार दौऱ्याचे निमित्त करून जिल्हा परिषदे व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करायला सुरवात केली आहे. पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आमदारकीची माळ पुन्हा गळ्यात पडल्याने शंभूराज देसाई पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या आभार दौऱ्यात आता पाटण पंचायत समितीवर भगवा फडकवणार अशी घोषणा केली आहे.
आपला दारुण पराभव झाला, परंतु पुन्हा कम बॅक करण्यासाठी पाटण पंचायत समितीच्या निवडणुका हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे विधानसभेला चार्ज झालेले कार्यकर्ते आपल्या हाताशी राहतील या धोरणातून अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी पराभवानंतर प्रथमच मतदारसंघात् जाऊन आभार मेळावे आयोजित केले. इतकेच नव्हे तर मुंबई येथे जाऊन पाटणकर यांनी आभार मेळाव्याचे आयोजन केले.एकूण 14 सदस्य संख्या असलेल्या पाटण पंचायत समितीची निवडणूक आमदारकीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी ठरते. आतापर्यंतचे कल पाहता आमदारकी गेली तरी पाटण पंचायत समितीची निवडणूक पाटणकर गटाला पोषक ठरलेली आहे. याउलट शंभुराज देसाई यांना पाटण पंचायत समितीची निवडणूक आमदारकी असो किंवा मंत्रिपद असो नेहमी जड गेली आहे.
तशी पाटण पंचायत समितीवर देसाई आणि पाटणकर गटांनी सत्ता गाजवली आहे. पाटण पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकांचे विश्लेषण करायचे झाल्यास कोयना विभागातील हेळवाक, शिरळ, चाफळ व म्हावशी गण आणि ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव आणि ढेबेवाडी पंचायत समिती गण तसेच तारळे विभागातील मुरुड पंचायत समिती गण पाटणकर गटाने वर्चस्व ठेवून पाटण पंचायत समितीची सत्ता काबीज केली होती. मंत्री आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी नाटोशी, मारूल हवेली, तारळे, मल्हार पेठ, नाडी नवा रस्ता आणि काळगाव आदी पंचायत समिती गणावर वर्चस्व कायम ठेवले.
आता यावेळी परिस्थिती बदललेली आहे असे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसते. तसेच झालेल्या अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत देखील आमदार शंभूराज गटाने मोठ्या संख्येने ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शंभूराजे देसाई यांनी कोयना, ढेबेवाडी, तारळे, चाफळ तसेच सर्वच विभागांतून मोठी आघाडी घेतली. त्यामुळे पाटणकर गटाला पंचायत समिती हवी असल्यास आत्तापासूनच जोरदार तयारी करावी लागेल अन्यथा शंभूराज देसाई गट पाटण पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व म्हणजे 14 जागा हस्तगत करेल हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे
अनेकांचे गुडघ्याला बाशिंग…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा लागतील याकडे नजरा लागलेले अनेक कार्यकर्ते पंचायत समितीची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून झटत आहेत. याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत आला. नेत्यांच्या मागे मागे जाऊन विधानसभेचा प्रचार करणेआणि फ्रंट फूटवर येणे म्हणजे आपल्याला उमेदवारी मिळेल यासाठी काहींनी प्रयत्न चालवले आहेत. काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी चालवली आहे.