मुंबई – गेल्या काही दिवसांपासून तांबे कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीयांची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष लढत आपला विजय खेचून आणला. यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सुधीर तांबे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
“ही व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब थोरात हे जेष्ठ नेते असून काँग्रेसच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही मात्र त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ का आली ? यावर विचार व्हायला हवा असं स्पष्ट मत सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.अशी माहिती एका मराठी वृत्तपत्राच्या वेब साईटने दिली आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये झालेल्या राजकारणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. सत्यजित तांबे यांनी देखील कुटुंबियांवर अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. अशात बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सत्यजित तांबेच्या बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा
बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. सत्यजित तांबे यांनी देखील थोरात यांना शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केले आहे.थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आबा!” अशा शब्दात तांबे यांनी थोरात यांना शुभेच्छा दिल्या आहेत.