अखेर ‘त्या’ नराधमास फाशीच ! १८ महिन्याच्या चिमुरडीवर केला होता अत्याचार;न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

हरदोई : उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात जवळपास 7 वर्षांपूर्वी 18 महिन्यांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केला होता. या प्रकरणात सुनावणी करताना आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.आता जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला ऐतिहासिक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. तसेच यामुळे समाजात एक कठोर संदेश जाईल आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्यास मदत होईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

2014 साली देहात कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रात एका गावात 18 महिन्यांच्या चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीने तिच्या घरुन उचलून नेले होते. यानंतर त्याने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. घटना उघड होऊ नये यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह तलावात फेकून दिला होता. याप्रकरणी भरपूर तपास आणि शोधाशोध केल्यानंतर गावातील लोकांना तिचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अशात सोमवारी अखेर हरदोईच्या अप्पर सत्र आणि जिल्हा न्यायालयाच्या कोर्ट नंबर 14 मधून ऐतिहासिक निर्णय सुनावण्यात आला. याप्रकरणी संबंधित व्यक्ती आरोपी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा आणि दोन लाखाचा दंड ठोठावण्यात आला. सरकारी वकील रामचंद्र राजपूत यांनी सांगितलं, की न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे समाजात योग्य आणि कठोर असा संदेश जाणार आहे. यामुळे अशा कृत्याचा विचार करतानाही एखादा व्यक्ती शंभर वेळा विचार करेल आणि त्याच्या मनात एक भिती निर्माण होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.