अखेर बरसला

पिंपरी – दरवर्षी पहिला पाऊस वाजत-गाजत अर्थात गडगडाट-कडकडाट करत मुसळधार येतो, परंतु यावर्षी मात्र खूपच दबक्‍या पावलांनी मॉन्सून दाखल झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून रोज ढग येत होते, परंतु पाऊस येत नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून मात्र मॉन्सून आल्याची चाहूल लागत आहे.

दोन्ही पालख्यांच्या आगमानासोबतच पाऊसही आला होता. पालख्यांनी पुढे प्रस्थान केल्यानंतर मात्र पावसाने हळू-हळू जोर धरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी थोडा वेळ पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी देखील पावसाने जोर धरला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दुपारच्या वेळी मात्र मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत होत्या.

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे यावर्षी धरणात पाणीसाठा कमी झाला होता. यावर्षी म्हणावा तसा अवकाळी पाऊसही न झाल्याने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली होती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात आतापर्यंतचा सर्वांत नीचांकी पाणीसाठा उरला आहे.

जेमतेम जुलैच्या मध्यापर्यंत पुरु शकेल एवढेच पाणी धरणात उरले आहे. पिंपरी-चिंचवडकर सध्या पाणीकपात झेलत आहेत. त्यामुळे यावर्षी पावसाळा लवकर सुरू व्हावा आणि भरपूर पाऊस पडावा, अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. परंतु याउलट जून महिन्याच्या अखेरीस मॉन्सूनचे आगमन झाले असून अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. यावर्षी उन्हाळा जरा जास्तच कडक होता. उन्हाळ्यातील बहुतेक दिवस तापमान 40 अंशांच्या आसपास होते. अजूनही सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. यामुळे नागरीक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्या पावसास सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.