मुंबई – काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होणार अशी चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून पालघरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेचं इंजिन भाजपला साथ देताना दिसणार आहे.
पालघरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. करोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे.
पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरू आहे, असंही जाधव म्हणाले. तर पालघरचे भाजपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.