पुणे – दोघेही उच्चशिक्षित, तो नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. त्याला दरमहा 30 लाख रुपये वेतन होते.त्यांना दोन मुलेही होती. सुखी संसार सुरू असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर जबाबदारी सोडून तो निघून गेला. पोटगीसाठी तिने अर्ज केला. तीदेखील कमावती असल्याने पुणे न्यायालयाने अर्ज फेटाळला. याविरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे 5 कोटी रुपयांची पोटगी देऊन दोघांचे मार्ग अखेर वेगळे झाले.
ती कमवती असल्याच्या मुद्द्यावर यापूर्वी पोटगी नाकारण्यात आली होती. मात्र, त्याच्या आणि तिच्या कमाईमध्ये लाखो रुपयांचा फरक होता. त्यामुळे त्याच्या राहणीमानाप्रमाणे तिला आणि मुलांना राहता आले पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, मात्र, तिच्या एकटीच्या पगारामध्ये हे शक्य नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने तिचा दावा निकाली काढला. अपिलाच्या सुनावणीत घटस्फोट द्यायला तोदेखील तयार झाला. जबाबदारी म्हणून पाच कोटी रुपये देण्यासही तो तयार झाला. या कायदेशीर लढाईसाठी मात्र, “तिला’ पाच वर्षे वाट पाहवी लागली. तिच्या’तर्फे ऍड. सुप्रिया कोठारी यांनी कामकाज पाहिले. उच्च न्यायालयात अपिलाच्या सुनावणीत मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चाची बिले सादर करण्यात आली. यांची जबाबदारी झटकली म्हणून न्यायालयाने त्याला सुनावले.