महाळुंगे इंगळे (पुणे) – जागतिक ऑटोमोबाइल हब अशी ओळख असणाऱ्या महाळुंगे इंगळे (ता. खेड) या गावात ऐन पावसाळ्यात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक कमालीचे हैराण झाले आहेत. दरम्यान, गावातील मूलभूत गरजाही भागवण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नागरिक घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत.
महाळुंगे इंगळे (ता. खेड) या गावात चारही बाजूने औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात उभे राहिल्या आहेत, त्यामुळे गेल्या 20 वर्षांत येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. लोकसंख्या वाढली; पण नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा मात्र वाढल्या नाहीत. गावाला स्वत:ची अशी पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने गेल्या 20 वर्षांपासून या गावात भीषण पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. जागतिक ऑटोमोबाइल हब अशी ओळख असणाऱ्या तसेच बहुराष्ट्रीय उद्योग या ठिकाणी उभारले गेले; परंतु गाव मात्र सुधारली नाहीत आजही गावात कचरा, पाणी, ड्रेनेज लाइन, रस्ते आदी प्रश्न आजही नागरिकांना भेडसावत आहेत.
आजही गावात सात ते आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळते, त्यामुळे गावातील महिला वर्गात प्रचंड नाराजी असून यावर लवकर उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे आभाळातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असताना देखील आम्हाला हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे अशी भावना गावातील महिलांनी व्यक्त केली.
“महाळुंगे गावात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असल्याने दररोज दहा लाख लिटर पाणी आवश्यक आहे परंतु याआधी गावात कोणतीही कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नसल्याने आज ही अवस्था आहे; परंतु आता गावाला कायमस्वरूपी पाण्याची सोय करून देणार तसेच 50 लाख लिटर पाणी गावाला दररोज मिळेल अशी व्यवस्था येत्या सहा महिन्यांत करून देणार आहे.’
– मंगल भोसले, सरपंच महाळुंगे इंगळे