न्यूयॉर्क – अमेरिकेत येत्या 8 डिसेंबर रोजी एका महिलेला इंजेक्शन देउन मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. एखाद्या महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही सत्तर वर्षातील पहिलीच घटना आहे.
एका गर्भवती महिलेची हत्या केल्यानंतर तिचे पोट कापून त्यातील बाळाचे अपहरण करण्याचा संबंधित महिलेचा गुन्हा सिध्द झाल्यामुळे तिला ही शिक्षा दिली जाणार आहे.
ही 2004 मधील घटना आहे. यातील दोषी ठरवण्यात आलेली महिला लिसा मॉंटगोमेरी एक पाळीव कुत्रा विकत घेण्यासाठी स्टीनेट नामक महिलेच्या घरात आली होती. त्यानंतर तिने दोरीच्या सहाय्याने संबंधित महिला अर्थात स्टीनेटची हत्या केली. त्यानंतर तिने मृत स्टीनेटचे पोट फाडले आणि तिच्या बाळाचे अपहरण केले. हत्या झाली त्यावेळी स्टीनेटला आठवा महिना सुरू होता.
पकडण्यात आल्यावर लिसाने आपला गुन्हा कबुल केला होता. तिला 2008 मध्ये हत्या आणि अपहरण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. तिच्या वकीलांनी तिच्या बचावासाठी अनेक प्रयत्न केलेत. ती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचाही युक्तीवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने सगळे तर्क फेटाळून लावत तिला दोषी ठरवले.
आता तिला मृत्यूदंड दिला जाणार असला तरी पशूलाही लाजवेल असे कृत्य तिने का केले, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र ज्या बाळाचे लिसाने अपहरण केले होते ती व्हिक्टोरिया सुखरूप असून ती आता १६ वर्षांची आहे. ती तिच्या पित्यासोबत राहते.