पुणे – तब्बल 35 दिवसांनंतर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रो डेपो, कास्टिंग यार्ड, नदीपात्र तसेच मेट्रोच्या भुयारी मार्गातील टनेलचे काम सुरू करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रशासनाने लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर महामेट्रोने शासनाकडे काम सुरू करण्यासाठी विनंती केली होती. शासनाने त्यास मान्यता दिल्यानंतर दोन दिवसांपासून हे काम सुरू केल्याची माहिती पुणे मेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली. देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होताच मेट्रोनेही आपले काम बंद केले होते. मात्र, त्यावेळी सुमारे 3 हजार कामगार मेट्रोच्या लेबर कॅम्पमध्ये अडकून पडले.
या कामगारांना मेट्रोकडून धान्य, वैद्यकीय सुविधा तसेच इतर सर्व प्रकारची साधने दिली होती. त्यातच केंद्राने मागील आठवड्यात लॉकडाऊन काही अंशी शिथिल केले होते. त्यात केंद्राने “मेट्रो प्रकल्पासाठी कर्मचारी असतील, तसेच कच्चा माल बाहेरून न आणता काम करणे शक्य असल्यास ते सुरू करावे,’ असे आदेश दिले होते. तसेच कामाच्या ठिकाणी तसेच मजूर ने आण करताना सोशल डिस्टन्स पाळले जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मेट्रोने हे काम सुरू केले आहे.
त्यात, नदीपात्रातील उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता शिवाजीनगर ते जिल्हा न्यायालयापर्यंतचे भुयारी मार्गाचे टनेल बोअरिंग मशीनचे काम तसेच रेंजहिल, आणि वनाज डेपोसह कास्टिंग यार्डमध्ये काम सुरू केल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. उर्वरित काम लवकरच पूर्ण करणार असन्याचेही ते म्हणाले.
पण, मुहूर्त हुकला..
महामेट्रोने मे अखेरपर्यंत वनाज ते गरवारे महाविद्यालय या 5 कि.मी. मार्गावर मेट्रो प्रकल्पाची चाचणी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे मेट्रोचे काम सुमारे 35 दिवस मागे पडले आहे. तर आता बाहेरून कोणताही कच्चा माल न आणता आहे त्या साहित्यामध्येच मेट्रोला काम करावे लागणार आहे. परिणामी, पुण्यातील मेट्रोचा मुहूर्त हुकणार आहे.