कारखाना अध्यक्ष, संचालक मंडळाशी चर्चा : सहकारातील प्रश्नांवर सूचना
माळेगाव – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यातील चर्चेचा आणि राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. या कारखान्याची निवडणूक राज्यभरात लक्षवेधी ठरते. तावरे- पवार गटांत राजकीय चुरस दोलायमान राहिली आहे. माळेगाव कारखान्याला शरद पवार यांनी 11 वर्षांनंतर भेट दिली.
सहकारातील माळेगाव कारखाना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे कायमच चर्चेत असते. या कारखान्याच्या भोवती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचे वलय आहे. गेल्या तीस वर्षांत तावरे- पवार यांच्या गटात सत्तेसाठी चुरस निर्माण झालेली होती. यात तावरे गटाने दोनवेळा विजय संपादन केला होता. माळेगाव कारखान्यावर अपवाद वगळता कायमच राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता राहिलेली आहे. गेल्या बारा वर्षांत शरद पवार यांनी काही कारणास्तव माळेगाव कारखान्यावर जाणे टाळले होते. आज प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार यांनी माळेगाव कारखान्यात जाऊन कामकाजाची माहिती घेतली.
विशेष म्हणजे पवार यांची वास्तव्यही माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना आणि शरद पवार यांच्यातील ऋणानुबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांच्याकडे सत्तासूत्रे एकवटली. तत्पूर्वी माळेगाव कारखाना हा ऊसदराच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिला होता. त्यामुळे तब्बल 11 वर्षे शरद पवार यांनी माळेगाव कारखान्यावर एकदाही भेट दिली नव्हती.
परिणामी पवार यांना सत्ता आल्यानंतरच सत्ता पुन्हा कारखान्यावर आणायचे, असा चंग राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधला होता. 2020 मध्ये झालेल्या कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता पुन्हा हस्तगत केली. त्यानंतर 2 वर्षांनी शरद पवार हे माळेगाव कारखान्यावर आले. त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि संचालक मंडळाकडून कारखान्याच्या कामकाजाची माहिती घेत काही सूचनाही दिल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, संचालक योगेश जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सहकार आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासू नेते शरद पवार यांनी माळेगाव कारखान्याला भेट दिली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शरद पवार यांचे मार्गदर्शन भविष्यात माळेगाव कारखान्याच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
– योगेश जगताप, संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना.