10 वर्षांनी हडपसरची जागा महाआघाडीला

चेतन तुपे यांचा विजय : तिरंगी लढतीमुळे सर्वांचे लागले होते लक्ष

हडपसर – महायुतीचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव करत महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी 2,820 मतांनी विजय मिळविला. येथे तिरंगी लढत होती. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच चेतन तुपे यांनी आघाडी घेतली, ती अखेरपर्यंत कायम ठेवली. टिळेकर यांचा पराभव हा शहर भाजपच्या दृष्टीने धक्‍कादायक ठरला.

10 वर्षांनी ही जागा महाआघाडीला मिळाल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हडपसर मतदार संघात भाजपच्या टिळेकर यांच्याविरुद्ध महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे रिंगणात होते. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे सुरुवातीपासून दिसत होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरवात झाली.

फेरीनिहाय वाढत गेली चुरस
पहिल्या दोन फेरीमध्ये चेतन तुपे यांनी अवघ्या 3 हजारांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ही आघाडी वाढत जावून पाचव्या फेरीपर्यंत 11 हजारांपर्यंत पोहोचली.त्यावेळी चेतन तुपे हे विजयी होणार असेच वाटत होते. त्यानंतर मात्र टिळेकर यांनी ही आघाडी तोडण्यास सुरुवात केली. 16 फेरी अखेरपर्यंत चेतन तुपे हे फक्‍त सतराशे मतांनी पुढे होते. त्यानंतरच्या फेरीमध्ये टिळेकर हे 400 मतांनी आघाडी घेतली, पण त्यानंतर पुन्हा टिळेकर हे मागे पडत गेले आणि चेतन तुपे यांचे मताधिक्‍य वाढत गेले. मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या झाल्या. अखेरची फेरी झाली तेव्हा चेतन तुपे यांना 92 हजार 326 तर, योगेश टिळेकर यांना 89 हजार 506 मते पडली. त्यामुळे अवघ्या 2 हजार 820 मतांनी तुपे हे विजयी झाले तर, मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांना 34 हजार 809 मते मिळाली.

पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
चेतन तुपे यांच्या पत्नी सोनल तुपे यांनी मतदार संघातील महिला कार्यकर्त्यांची फळी नियोजनबद्ध प्रचारात उतरवली होती. त्यामुळे त्यांनी या यशामध्ये पुरुष कार्यकर्त्यांबरोबरच महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतंत्रपणे घरटी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांचे हे योगदान या विजयात महत्त्वाचे ठरले आहे.’ असेही सोनल तुपे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.