नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हत्याकांडात आता आणखी खळबळजनक सत्य समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित श्रद्धा वालकरची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यात ती आरोपी आफताबला तिला ठार मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे ती म्हणत आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात ही क्लिप सादर करण्यात आली आहे.
दिल्लीच्या विशेष न्यायालयात राज्य सरकारकडून अमित प्रसाद यांनी बाजू मांडली यावेळी त्यांनी, श्रद्धा आणि आफताब यांच्यातील लिव्ह-इन-रिलेशनशिपचा हिंसक भूतकाळ असल्याचे न्यायालयात म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी दोघांमध्ये झालेल्या एका संवादाची क्लिप न्यायालयासमोर सादर केली. पोलिसानी या प्रकरणी तपास केला असता त्यांच्या हाती आफताब आणि श्रद्धा यांचे ऑगस्ट २०२१ मध्ये मानसोपचार तज्ज्ञासोबत काही सेशन झाली होती. त्यातील एका सेशनमध्ये श्रद्धा मानसोपचार तज्ज्ञाला, ज्यावेळी आमचे वाद होतात त्यावेळी आफताब आपल्याला मारत असल्याची माहिती देत आहे.
पुढे ती म्हणते, मला मारण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वी अनेकदा आफताबने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ज्यावेळी आपण त्याचा विरोध करून लपून बसायचो त्यावेळी तो मला शोधून मारण्याचा प्रयत्न करायचा. तसेच एकवेळ तर त्याने माझी मान एवढ्या जोरात पकडली होती कि मला ३० सेकंद श्वास घेता आला नाही असे श्रद्धा म्हणत असल्याचे म्हणत आहे.
दरम्यान, या ऑडियो क्लिपला पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्याच्या आधारे न्यायालयाने निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकिलाकडून करण्यात आली आहे.