पुणे – अमनोरा पार्क जवळच्या एका पबमध्ये आयोजित “अफ्रो नाईट पार्टी’वर पोलिसांनी छापा टाकला. येथून 62 जणांना ताब्यात घेण्यात आले त्यात 22 महिलांचा समावेश होता. यामध्ये काही आफ्रिकन देशातील नागरिकांचा समावेश आहे. या पार्टीच्या निमंत्रण पत्रात आफ्रिकन युवतीचे नाचतानाचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे या पार्टीबाबत गूढ होते. मात्र, त्यात फारसे काही आक्षेपार्ह आढळले नाही. मात्र, करोना नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक, कर्मचारी आणि उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. यानुसार हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्स, आसन क्षमता आणि प्रवेशाची मर्यादा घालण्यात आली. हॉटेल बंद करण्याची वेळ रात्री दहाची ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त नम्रता पाटील यांना अमनोरा पार्क लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये अफ्रो नाईट पार्टीचे आयोजन करण्यात आले असून येथे परदेशी नागरिक सहभागी झाल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार संबंधीत हॉटेलवर रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकण्यात आला. तेव्हा करोनासंदर्भातील सर्व नियम पायदळी तुडवत पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे दिसले. पोलिसांनी हॉटेल मालक, वेटर आणि उपस्थित ग्राहकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अफ्रो पार्टीचे निमंत्रण सोशल मीडियावरून देण्यात आले होते. व्हॉटस्ऍप आणि फेसबुकवरही हे निमंत्रण फिरत होते. यामध्ये मोठ्या संख्येने आफ्रिकन देशातील महिला व पुरुष सहभागी झाले होते. विशेष म्हणजे नियमानुसार हॉटेल बंद करायची वेळ रात्री दहाची असताना पार्टी नऊ वाजता सुरू करण्यात आली होती. ती रंगात आली असतानाच पोलिसांनी कारवाई केली.