नवी दिल्ली – केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मनंथवडी येथील दोन पशुसंवर्धन केंद्रांमध्ये आज ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’ची प्रकरणे आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस, भोपाळ येथे नमुने तपासल्यानंतर जिल्ह्यातील दोन पशुसंवर्धन केंद्रातील डुकरांमध्ये या आजाराची पुष्टी झाली आहे.
300 डुकरांना मारण्याच्या सूचना
केरळच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एका केंद्रात अनेक डुकरांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्यामध्ये हा ‘आफ्रिकन फिव्हर’ निश्चित झाला आहे. तर दुसऱ्या केंद्रात 300 डुकरे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे विभागाने सांगितले.
आफ्रिकन स्वाईन फिव्हर म्हणजे काय?
आफ्रिकन स्वाईन फिव्हर हा जंगली आणि पाळीव डुकरांमध्ये एक अत्यंत वेगाने संक्रमित होणारा विषाणूजन्य रोग आहे. ज्याचा मृत्यू दर 100 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. संसर्गाचा मानवांना धोका नसला तरी, आजारी डुकरांच्या संपर्कात येणारे पशुधन मालक किंवा कामगार इतर प्राण्यांना संसर्ग पसरवू शकतात. हा विषाणू कपडे, बूट, चाके आणि इतर सामग्रीवर जिवंत राहू शकतो. हॅम, सॉसेज आदी डुकराच्या मांसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवरदेखील हा विषाणू जिवंत राहू शकतो.