अबुधाबी -आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आठवड्याच्या आतच आणखी एक कसोटी सामना दोन दिवसांच्या आत संपुष्टात आला. या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला.
कर्णधार सीन विल्यम्सच्या शतकी खेळीनंतर ब्लेसिंग मुझार्बनी आणि व्हिक्टर नायुची यांच्या भेदक वेगवान माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने दुसऱ्या दिवसाचा पूर्ण खेळ होण्यापूर्वीच विजयावर शिक्कामोर्तब केले.
विल्यम्सच्या (105) शतकी खेळीने झिम्बाब्वेचा डाव 250 धावांची मजल गाठू शकला. पहिल्या डावात 119 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात पहिल्या डावापेक्षा चार धावा अधिक केल्या. त्यांचा दुसरा डाव 135 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर विजयासाठी 17 धावांची औपचारिकता झिम्बाब्वेने 3.2 षटकांत पार पाडली.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ जवळपास एक वर्षांनी कसोटी सामना खेळत होते. झिम्बाब्वेच्या न्यायुची, मुझार्बनी आणि डोनाल्ड तिरीपानो या तीन वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या 20 पैकी 16 विकेट घेतल्या. त्याचवेळी अफगाणिस्तानकडून अमिर हमझाने कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करताना 75 धावांत 6 गडी बाद केले. त्याने सलग दुसऱ्या कसोटीत डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. दुसरा कसोटी सामना याच मैदानावर 10 मार्चपासून सुरू होणार आहे.
अफगाणचे पहिलेच क्रिकेट पंच
अहमद शाह पक्तीन हे अफगाणिस्तानचे पहिले कसोटी पंच ठरले आहेत. या सामन्यात त्यांनी पाकिस्तानच्या अलिम दर यांच्यासह मैदानावरील पंच म्हणून काम पाहिले. पक्तीन यांनी जानेवारी 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना आतापर्यंत 15 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामन्यात काम पाहिले आहे. त्यांचा हा पहिलाच कसोटी सामना होता.
संक्षिप्त धावफलक –
झिम्बाब्वे – पहिला डाव – सर्वबाद 250 धावा. (सीन विल्यम्स 105, हमझा 6-75) व दुसरा डाव – बिनबाद 17 धावा. वि. वि. अफगाणिस्तान – पहिला डाव – सर्वबाद 131 धावा. व दुसरा डाव – सर्वबाद 135 धावा. (झद्रन 76, तिरीपानो 3-23)