लखनौ : करीम जनत यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने दुस-या टी-२० क्रिकेट सामन्यात विंडिजचा ४१ धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेत अफगाणिस्तानने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
Afghanistan beat @windiescricket by 41 runs in the 2nd match of Azizi Bank T20I Cup to level the series 1-1. #AFGvWI pic.twitter.com/gu866aUupg
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 16, 2019
विजयासाठी १४८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या प्रभावी गोलंदाजीसमोर विंडिजच्या संघाला २० षटकांत ८ बाद १०६ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. विंडिजकडून फलंदाजीत दिनेश रामदिनने सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या पण संघास विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. विडिंजचे बाकी फलंदाज स्वस्तात बाद झाले. ब्रैंडन किंग १२, एविन लुइस १४, शिमरन हेटमायर ११ तर कायरन पोलार्ड ७ धावांवर बाद झाला.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत करीम जनत याने सर्वाधिक ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राशिद खान, गुल्बदीन नाएब आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताने २० षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून फलंदाजीत हजरत जजईने १५ चेंडूत ३ चौकार व १ षटकांरासह २६ तर करीम जनतने १८ चेडूंत २६ धावा केल्या.याशिवाय गुल्बदीन नाएबने २४ आणि नजीबुल्लाहने नाबाद २० धावा करत संघाची धावसंख्या १४७ पर्यंत नेली. विंडिजकडून केसरिक विलियम्सने ३ तर कीमो पाॅल आणि जेसम होल्डर याने प्रत्येकी १ गडी बाद केला.
फलंदाजीत १८ चेंडूत २६ धावा आणि गोलंदाजीत ४ षटकात ११ धावा देत ५ गडी बाद करून सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या करीम जनत याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना १७ नोव्हेंबरला (रविवार) होणार आहे.