अफगाणिस्तानकडून चमत्काराची अपेक्षा
स्थळ : सोफिया गार्डन्स, कार्डिफ
वेळ : सायं. 6 वा.
कार्डिफ – विश्वचषक स्पर्धांमधील खराब कामगिरीमुळे ‘चोकर’ समजल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी आज येथे अफगाणिस्तानविरूध्द मिळणार आहे. पहिल्या विजयासाठी उत्सुक असलेला अफगाणिस्तानचा संघही चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमधील तीन सामने आफ्रिकेने गमावले असून त्यांचा वेस्ट इंडिजविरूध्दचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या जवळ जवळ दुरापास्त झाल्या आहेत. अफगाणिस्तानने आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. अपयशाची मालिका संपविण्यासाठी तेदेखील आशावादी आहेत. आफ्रिकेचे खेळाडू बेभरवशाचे असतात, त्यामुळेच त्यांच्यावर सनसनाटी मात करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
प्रदीर्घ अनुभव पाठिशी असलेल्या हाशिम अमला या सलामीवीराचे अपयश ही आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यांच्या फलंदाजीची मुख्य मदार कर्णधार फाफ डुप्लेसिस, क्विन्टॉन डीकॉक, जीन पॉल ड्युमिनी, डेव्हिड मिलर यांच्यावर आहे. गोलंदाजीत त्यांना कागिसो रबाडा, इम्रान ताहिर, ख्रिस मॉरिस यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
अफगाणिस्तानची दोन्ही आघाड्यांवर फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. फलंदाजीत रहमत शाह, नजीबुल्ला झाद्रान, कर्णधार गुलबदीन नजीब, रशीद खान यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंनी निराशा केली आहे. विश्वचषक स्पर्धेचा अनुभव असलेल्या मोहम्मद शहजाद याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्यांची बाजू थोडिशी कमकुवत झाली आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
अफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.
दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.