काबुल – अफगाणिस्तानच्या नूरग्राम परिसरात असलेल्या जंगलात वणवा पेटला आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा वणवा विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काही फायरफायटर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र या प्रयत्नांना यश येत नसल्याचे चित्र आहे. या फायरफायटर्समध्ये आवश्यक असणारी आधुनिक यंत्रणा नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास वेळ लागत असल्याचे आपत्ती व्ववस्थापन मंत्री जनन साईक यांनी म्हटले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेतच. मात्र आणखी काही दिवस तर त्यात यश आले नाही, तर शेजारील राष्ट्रांची मदत मागण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही. शेजारील राष्ट्रांकडे असणारी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा अफगाणिस्तानला पाठवण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आग डोंगराळ भागात भडकली असल्यामुळे हेलिकॉप्टर्सना अधिक उंची गाठावी लागत आहे. आमच्याकडे सध्या असलेली हेलिकॉप्टर्स ही एवढी उंची गाठू शकत नाहीत. आम्ही इस्लामिक एमिरेस्ट्सकडे असणारी आधुनिक विमानने पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र ती विमानेदेखील एवढ्या उंचीवर जाऊन आग विझवू शकतील, असे वाटत नाही. सध्या आम्ही हतबल आहोत, अशी प्रतिक्रिया साईक यांनी दिली आहे.
आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे लक्षात आल्यावर आता अफगाणिस्तान सरकारडे शेजारी राष्ट्रांची मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे.