अफगाणिस्तानचे शिष्टमंडळ दोहामध्ये तालिबान्यांना भेटणार

काबुल – अफगाणिस्तानचे अनेक नेत्यांचे एक शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यामध्ये दोहा इथे तालिबानी नेत्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये कोण कोण अधिकारी असावेत यासाठी अफगाणिस्तान सरकारकडून गेल्या आठवड्याभरापासून नावांची यादी तयार केली जात होती. अध्यक्ष्यांच्या राजप्रासादातील कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये 250 अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये अध्यक्ष अशर्रफ गनी यांचे “चीफ ऑफ स्टाफ’ अब्दुल सलाम रहमी आणि अफगाणिस्तानचे गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अमरुल्ला सालेह यांचाही समावेश आहे. यादीमधील अन्य अधिकाऱ्यांमध्ये अनेक युवा अधिकारी, आदिवासी पट्टयातील जुने जाणते अधिकारी आणि 52 महिलांचाही समावेश आहे, हे विशेष. यापूर्वी 2015 मध्ये तालिबानी नेत्यांबरोबर अफगाणिस्तान सरकारबरोबरची चर्चा पाकिस्तानातील गोपनीय ठिकाणी झाली होती. अफगाण तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला ओमर ठार झाल्याची बातमी मिळाल्याने ही चर्चा ताबडतोब थांबवली गेली होती.

अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानी नेत्यांमध्ये कतारमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस चर्चा होणार आहे. अमेरिकेकडून गेल्या महिन्याभरापासून शांतता चर्चेसाठी जोरदार आग्रह धरल्यामुळे ही चर्चा होत आहे. दोहामधील चर्चेसाठी तालिबानकडून कोण येणार याची यादी समोर आलेली नाही. मात्र गनी यांचे सरकार हे अमेरिकेच्या हातातील बाहुले असल्याची टीका तालिबानकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे या चर्चेतून ठोस फलित निष्पन्न होण्याची शक्‍यता कमी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.