नवी दिल्ली – अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) देशांतर्गत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक नूर मोहम्मद ललाई याच्यावर मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्याने कारवाई केली आहे. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूला सामना निश्चित (स्पाॅट फिक्सिंग)करण्यासाठी ऑफर दिल्याबद्दल नूर मोहम्मद दोषी आढळला आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंनी त्याच्याबदल तक्रार नोंदविली होती. एसीबीने या खेळाडूची ओळख जाहीर केलेली नाही.
नूर मोहम्मद हा कपिसा प्रांत संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता तर हंपालाना क्रिकेट अकादमीचा पूर्ण-वेळ प्रशिक्षक होता. दरम्यान, यापूर्वी एसीबीने तीन महिन्यांपूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणी माजी यष्टिरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शाफाक वर सहा वर्षाची बंदी घातली होती.