#CWC19 : विश्वचषकात आज ‘भारत-अफगाणिस्तान’ आमनेसामने

भारत विरूध्द अफगाणिस्तान
स्थळ – रोझ बाऊल, साउदॅम्पटन
वेळ – दुपारी 3.00 वाजता

साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवित उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी भारताला मिळणार आहे. मैदानावर व मैदानाबाहेरही खराब प्रदर्शन होत असलेल्या अफगाणिस्तानने शान राखण्यासाठी चांगली कामगिरी करावी अशीच त्यांच्या चाहत्याम्ची अपेक्षा आहे.

शिखर धवनच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. या सामन्यात दुखापत झाल्यामुळे धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्यासाठी बदली खेळाडू म्हणून ऋषभ पंत याला भारतामधून पाचारण करण्यात आले आहे. तथापि धवनच्या जागी के.एल. राहुल याला पाकिस्तानविरूद्ध सलामीस संधी मिळाली होती. त्याचा फायदा घेत राहुल याने रोहित शर्माच्या साथीत शैलीदार सलामी केली होती. त्यामुळेच सलामीची समस्या सुटली आहे.

-अपरजित्व राखण्यासाठी भारताला आज सोपा पेपर
-अफगाणिस्तानकडून चांगल्या खेळाची अपेक्षा

अष्टपैलू विजय शंकर हा तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता कमीच आहे. जर शंकर खेळू शकला नाही तर अनुभवी दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यापैकी एका खेळाडूची वर्णी या संघात लागण्याची शक्‍यता आहे. जखमी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर याच्याजागी मोहम्मद शमी याचा समावेश केला जाईल.

अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या लढतीत 50 षट्‌के खेळून चिवट झुंज दिली होती. मात्र या सामन्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये धूडगूस घातला होता. त्यांच्या या बेशिस्त वर्तनाची आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हा कलंक मैदानावरील चांगल्या कामगिरीद्वारे पुसून काढण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या फलंदाजांनी चिवट लढत दिली आहे. भारताच्या कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांना ते कसे सामोरे जातात हीच उत्सुकता आहे.

भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

अफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)