इस्लामाबाद – तालिबान सरकारने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथे महिलांवर निर्बंध लादण्यास सुरवात केली होती. महिलांच्या खेळण्यावरही त्यांनी बंधने आणली होती. खेळणे म्हणजे निव्वळ देहप्रदर्शन अशी भूमिका तालिबानने घेतली होती. त्यामुळे अफगाणिस्तानच्या 32 महिलां फुटबॉलपटूनी आपल्या कुटुंबिंयासह पाकिस्तानाची वाट धरली. यापूर्वी महिलांना धमकावलेही जात होते.
त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन मानवतावादी व्हिसा देखिल काढण्यात आला. त्यानंतर या महिला खेळाडूंनी हे पाऊल उचलले.आता या सर्वांना पेशावरहून पाकिस्तान फुटबॉल महासंघाचे कार्यालय असलेल्या लाहोरला नेण्यात येईल. तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात येईल.या फुटबॉलपटूंमध्ये जास्त करून अफगाणिस्तानच्या ज्युनियर खेळाडूंचा समावेश आहे. या मुली खरे तर कतारला जाणार होत्या.
येथे फिफाने 2022 विश्वकरंडकासाठी अफगाणिस्तानमधील निर्वासितांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर त्यांना आपला कार्यक्रम बदलावा लागला. या 32 फुटबॉलपटूंना पाकिस्तानात आणण्यासाठी ब्रिटनस्थित स्वयंसेवी संस्था पाकिस्तान फुटबॉल महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करत होत्या. त्याला फिफाने मान्यता दिली नाही.