काबुल – अफगाणिस्तानमधील उरुझन आणि कंदहार प्रांतांमध्ये सुरक्षा फौजांनी एकाच वेळी केलेल्या कारवाईदरम्यान 28 तालिबानींचा खात्मा करण्यात आला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आज ही माहिती देण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी काल कंदहार प्रांतातील दंड, मारोफ आणि झेराई जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत 18 तआलिबानी मारले गेले.
तालिबानींनी अफगाणी फौजांच्या ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर येथील संघर्षाला सुरुवात झाली होती, असे संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर उरुझन प्रांतात देह रावोड जिल्ह्यातील कारवाईद्रम्यान आणखी 10 तालिबानी मारले गेले तर अन्य 5 जण जखमी झाले असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
तालिबान्यांनी दोन्ही प्रांतांमध्ये पेरलेले 81 आयईडी अफगाणी फौजांच्या तंत्रज्ञांनी निकामी केले.
अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान्यांमध्ये कतारची राजधानी दोहा इथे शांतता प्रक्रियेबाबतची चर्चा सुरू असतानाही हा संघर्ष सुरू आहे. तालिबानविरोधात अफगाणी फौजांची धडक कारवाई सुरू असताना रॉकेट आणि बॉम्बचाही सर्रास वापर केला जातो आहे.