काबूल – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथे अनेक घटना घडत आहेत. तालिबानकडून नागरिकांचा छळ करण्यात येत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक लोकांनी देश सोडला तर अजूनही काही लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. जे लोक तिथे राहिले ते भितीच्या छायेत जीवन जगत आहेत. अशातच येथील प्रसिद्ध गायक गायन सोडून भाजीविक्रेता बनल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध गायक हबीबुल्लाह शबाब यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात ते भाजी विकताना दिसत आहेत. या फोटोसह माहिती दिली जातेय की अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यानंतर हबीबुल्लाह शबाबने गायन सोडून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. माध्यमांशी बोलताना हबीबुल्लाह म्हणाले की, आता त्यांना गायणाची इच्छा नाही, त्यांना स्वत:चा छोटा व्यवसाय करयाचा आहे.
हबीबुल्लाह शबाब हे अफगाणिस्तानातील प्रसिद्ध गायक आहेत. स्थानिक माध्यमांनी ट्विटर हँडलवर गायकाचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ते काळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि त्यांच्या समोर भरपूर भाज्या ठेवल्या आहेत. फोटोमध्ये हबीबुल्लाहसोबत एक लहान मूलही दिसत आहे आणि त्याच्यासमोर भरपूर खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत. हा फोटो शेअर करण्याबरोबरच ट्विटरवर लिहिले आहे की, ‘तालिबानच्या ताब्यानंतर एका आठवड्यातच प्रसिद्ध अफगाण गायकाने भाजीपाला विकायला सुरुवात केली आहे’.